केज/प्रतिनिधी :१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त आनंदगाव (सा.) येथील येडेश्वरी सहकारी साखर कारखाना परिसरात झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा न ठेवण्यात आल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने खासदार बजरंग सोनवणे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणी खासदार सोनवणे यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केज तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे केज तालुक्यातील पदाधिकारी शरद सखाहारी धिवार, रा. काळेगाव-घाट यांनी हे निवेदन दिले आहे. निवेदनानुसार, १५ ऑगस्ट रोजी येडेश्वरी सहकारी साखर कारखान्यावर खासदार बजरंग सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मात्र, या कार्यक्रमात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा ठेवण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ही बाब अनावधानाने नव्हे, तर जाणीवपूर्वक करण्यात आल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. संविधानाची शपथ घेऊन खासदारपद भूषवणाऱ्या लोकप्रतिनिधीकडून संविधान निर्मात्याचा अवमान झाल्याचा दावा करत संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
२५ ऑगस्टपासून बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा
प्रशासनाने २४ ऑगस्ट २०२६ पर्यंत खासदार बजरंग सोनवणे यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला नाही, तर २५ ऑगस्ट २०२६ पासून केज तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा शरद धिवार यांनी दिला आहे.या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच दलित चळवळीतील विविध संघटनांचे सहकार्य राहणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, निवेदनाच्या प्रती बीड जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, केज तसेच केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे माहिती व पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आल्या आहेत.

