अहिल्यानगर–बीड डेमूचा प्रवास आता अधिक सुसाट; प्रवाशांचा पाऊने दोन तास वाचणार!खा.बजरंग सोनवणे यांची माहिती; १ सप्टेंबरपासून मध्य रेल्वेचे नवे सुधारित वेळापत्रक लागू
बीड: अहिल्यानगर ते बीड या महत्त्वाच्या मार्गावर धावणाऱ्या डेमू ट्रेनच्या वेगात लक्षणीय वाढ करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असून, गाड्यांचे सुधारित वेळापत्रकही अधिकृतपणे अधिसूचित करण्यात आले आहे. या नव्या निर्णयामुळे दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ तब्बल १ तास ३५ मिनिटांनी कमी झाला असून, आता हा पूर्ण प्रवास अवघ्या ४ तासांत पार पडणार आहे.
खा. बजरंग सोनवणे यांनी या संदर्भातील माहिती प्रसिद्धीस दिली आहे.पुणे विभाग मध्य रेल्वेचे सुधारित वेळापत्रक १ सप्टेंबर २०२६ पासून सुरू होणाऱ्या सर्व प्रवासांसाठी लागू केले जाणार आहे. अहिल्यानगर आणि बीड या दोन शहरांदरम्यान प्रवाशांची सोय वाढवणे, तसेच त्यांना अधिक जलद आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देणे हा या वेगवाढीमागील मुख्य उद्देश आहे. गाड्यांचा वेग वाढल्यामुळे दैनंदिन नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थी आणि सामान्य प्रवाशांची मोठी वेळेची बचत होणार आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार, गाडी क्रमांक ७१४४१ अहिल्यानगर – बीड डेमू सेवा १ सप्टेंबरपासून अहिल्यानगर स्थानकावरून सकाळी ६:५५ ऐवजी ५० मिनिटे उशिरा, म्हणजेच सकाळी ७:४५ वाजता सुटेल. मात्र, वेगात वाढ केल्यामुळे ही गाडी बीड येथे पूर्वीच्या दुपारी १२:३० ऐवजी खूप आधी, म्हणजेच सकाळी ११:४५ वाजताच पोहोचेल. परतीच्या प्रवासात, गाडी क्रमांक ७१४४२ बीड – अहिल्यानगर डेमू सेवा बीड स्थानकावरून दुपारी १:०० ऐवजी एक तास आधी, म्हणजेच दुपारी १२:०० वाजता प्रस्थान करेल. ही गाडी अहिल्यानगर येथे जुन्या वेळेनुसार सायंकाळी ६:३० ऐवजी तब्बल अडीच तास आधी, म्हणजेच दुपारी ४:०० वाजता पोहोचेल.—असे आहेत रेल्वेथांबा या दोन्ही गाड्यांच्या प्रवासादरम्यान अहिल्यानगर, नारायणदोहो, न्यू लोणी, सोलापूरवाडी, न्यू धानोरा, कडा, न्यू आष्टी, वेताळवाडी, हाटोला, अमळनेर भांड्याचे, जटनानदूर, विघनवाडी, रायमोहा, राजुरी आणि बीड या सर्व प्रमुख स्थानकांवर नेहमीप्रमाणे थांबे कायम राहणार आहेत.—रेल्वे विभागाचे अवाहन दरम्यान, मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, त्यांनी या नव्या आणि सुधारित वेळापत्रकाची गांभीर्याने नोंद घ्यावी आणि त्यानुसारच आपल्या प्रवासाचे नियोजन करावे.
मार्गावरील सर्व मध्यवर्ती थांबा स्थानकांवरील गाड्यांच्या आगमनाची व प्रस्थानाची अचूक वेळ तपासण्यासाठी प्रवाशांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी भारतीय रेल्वेच्या www.enquiry.indianrail.gov.in या चौकशी पोर्टलला भेट द्यावी किंवा मोबाईलमधील अधिकृत NTES (National Train Enquiry System) ॲपचा वापर करावा, असे रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

