Tuesday, November 24, 2026
Homeबीड जिल्हालोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा; आयुक्त डॉ. किरण जाधव यांच्या सूचना

लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा; आयुक्त डॉ. किरण जाधव यांच्या सूचना

Spread the love

नागरिकांना सर्व शासकीय सेवा ऑनलाइन आणि विहित कालमर्यादेत देण्याचे निर्देश

बीड : लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान प्रशासनासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ ची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक असून, नागरिकांना त्यांच्या हक्काच्या शासकीय सेवा विहित कालमर्यादेत उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त डॉ. किरण जाधव यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे आयोजित आढावा बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी नागरिकांना शासकीय सेवा मिळताना येणाऱ्या अडचणी, सेवा देण्यासाठी निर्धारित करण्यात आलेल्या कालमर्यादा, ऑनलाइन सेवांची उपलब्धता तसेच लोकसेवा हक्क कायद्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला.

शासकीय सेवा देताना प्रशासनाने अधिक पारदर्शकता आणि तत्परता दाखविण्याची गरज असल्याचे डॉ. जाधव यांनी स्पष्ट केले. नागरिकांना आवश्यक असलेल्या सर्व शासकीय सेवा शक्य तितक्या ऑनलाइन उपलब्ध करून द्याव्यात. तसेच नागरिकांनी केलेल्या अर्जांवर विहित कालमर्यादेत कार्यवाही करून सेवा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या दर्शनी भागात त्या कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या अधिसूचित सेवांची माहिती, तसेच प्रत्येक सेवेसाठी निर्धारित कालमर्यादा स्पष्टपणे प्रदर्शित करावी, असेही त्यांनी सांगितले.

यामुळे नागरिकांना कोणती सेवा किती कालावधीत मिळणे अपेक्षित आहे, याची स्पष्ट माहिती मिळण्यास मदत होणार आहे.आपले सरकार सेवा केंद्रांमध्ये तक्रार पेटीची व्यवस्था करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. नागरिकांना सेवा मिळताना काही अडचणी आल्यास त्याबाबत तक्रार किंवा सूचना सहजपणे नोंदविता यावी, यासाठी प्रभावी व्यवस्था निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला.डिजिटल युगात नागरिकांना आवश्यक प्रमाणपत्रे आणि इतर कागदपत्रे वेळेत मिळणे महत्त्वाचे आहे.

त्यामुळे डिजिटल प्रमाणपत्रे तत्काळ उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांनी आवश्यक ती कार्यवाही करावी, असे निर्देश डॉ. जाधव यांनी दिले. प्रशासनातील अनावश्यक विलंब टाळून नागरिकांना जलद आणि सुलभ सेवा देण्याची कार्यपद्धती विकसित करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.यावेळी जिल्हाधिकारी श्री. विवेक जॉन्सन यांनी जिल्ह्यातील सर्व विभागांनी नागरिकांना विहित मुदतीत सेवा देण्याचे निर्देश दिले. लोकसेवा हक्क कायद्याची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी व्यापक जनजागृती करावी, तसेच नागरिकांना त्यांच्या हक्कांची माहिती देण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमामुळे नागरिकांना विविध शासकीय सेवा ठरावीक कालमर्यादेत मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. त्यामुळे हा कायदा केवळ प्रशासकीय प्रक्रिया न राहता नागरिकांचा हक्क आणि प्रशासनाची जबाबदारी म्हणून प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे.बीड जिल्ह्यातील प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, तसेच नागरिकांना सुलभ, पारदर्शक आणि वेळेत शासकीय सेवा उपलब्ध करून द्याव्यात, यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.

digitalbeed
digitalbeedhttp://digitalbeed.in
DigitalBeed.in हे बीड जिल्हा तसेच महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या, सरकारी योजना, शेती, शिक्षण, नोकरी आणि तंत्रज्ञान विषयक माहिती देणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमचे उद्दिष्ट वाचकांपर्यंत अचूक, विश्वासार्ह आणि जलद बातम्या पोहोचवणे आहे. बीड जिल्ह्यातील केज, माजलगाव, अंबाजोगाई, परळी, गेवराई, आष्टी आणि इतर भागातील स्थानिक घडामोडी आम्ही सातत्याने प्रसिद्ध करतो. ताज्या अपडेटसाठी DigitalBeed.in नियमित वाचा आणि आमच्या सोशल मीडियावर देखील जोडलेले राहा.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सर्व बातम्या

Recent Comments