न्याय न मिळाल्यास ३० तारखेला नगरपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा
केज / प्रतिनिधी
केज-बीड महामार्गालगत असलेल्या सर्वे.न ३०/२ मधील गायरान जमिनीतील २० गुंठे जागा माता रमाई बौद्ध विहारासाठी आरक्षित करावी, या मागणीने आता आक्रमक वळण घेतले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीसाठी दलित नेते तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे केज तालुका अध्यक्ष दीपक कांबळे यांनी प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला आहे.
केवळ आश्वासनांचे गाजर दाखवून समाजाच्या न्याय्य मागणीकडे दुर्लक्ष केले जात असेल, तर हा अन्याय आता सहन केला जाणार नाही, असा ठाम इशारा त्यांनी दिला आहे.केज-बीड रोडवरील गायरान जमिनीमध्ये विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आलेली आहे. या परिसरात माता रमाई बौद्ध विहार उभारण्यासाठी २० गुंठे जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी गेल्या जवळपास १५ वर्षांपासून सातत्याने केली जात आहे. मात्र, एवढा प्रदीर्घ कालावधी उलटूनही प्रशासनाकडून या मागणीला न्याय मिळालेला नाही. निवेदने, पाठपुरावा आणि विनंत्या करूनही प्रश्न मार्गी लागत नसेल, तर सामान्य नागरिकांनी न्याय मागायचा तरी कोणाकडे, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
या मागणीसंदर्भात माता रमाई बौद्ध विहार संघर्ष कृती समितीच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. केजचे तहसीलदार यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर करण्यात आले असून, बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनाही ई-मेलद्वारे निवेदन पाठविण्यात आले आहे. या निवेदनावर दलित नेते तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे केज तालुकाध्यक्ष दीपक कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. त्यामुळे ही मागणी आता केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित राहिलेली नसून, सामूहिक जनभावनेचा आवाज बनली आहे.माता रमाई या केवळ एका समाजाच्या नव्हे, तर त्याग, संघर्ष आणि समतेच्या विचारांचे प्रतीक आहेत. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनप्रवासात माता रमाईंचे योगदान अनन्यसाधारण आहे.
अशा त्यागमूर्तीच्या नावाने बौद्ध विहार उभारण्यासाठी जागेची मागणी करावी लागणे आणि त्यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागणे, ही प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब आहे.दलित नेते दीपक कांबळे यांनी या प्रश्नावर आता निर्णायक भूमिका घेतली असून, प्रशासनाने ३० तारखेपूर्वी सकारात्मक निर्णय घेऊन जागेचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा ३० तारखेला केज नगरपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. हा केवळ जागेचा प्रश्न नसून समाजाच्या अस्मितेचा, सांस्कृतिक अस्तित्वाचा आणि संविधानाने दिलेल्या समान हक्कांचा प्रश्न असल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे.
आता केज नगरपंचायत प्रशासन आणि संबंधित शासकीय यंत्रणा या मागणीची कितपत दखल घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विकासाच्या घोषणा आणि आश्वासनांच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. पंधरा वर्षांचा संघर्ष अजून किती काळ चालणार? समाजाच्या न्याय्य मागणीला उत्तर देण्यासाठी प्रशासनाला आणखी किती निवेदनांची प्रतीक्षा आहे? असे सवाल उपस्थित होत आहेत.आता निर्णय प्रशासनाने घ्यायचा आहे!
माता रमाई बौद्ध विहाराच्या जागेचा प्रश्न मार्गी लावून समाजाला न्याय द्यायचा की ३० तारखेपासून सुरू होणाऱ्या आमरण उपोषणाला सामोरे जायचे, हे येणारा काळच ठरवेल.

