केज / प्रतिनिधी : –
पाण्याची आवश्यकता असल्याने पाण्याच्या शोधात गेलेल्या 60 वर्षीय वृद्धाचा विहिरीत पडून गंभीर अपघात झाल्याची घटना केज तालुक्यातील लाडेवडगाव येथे घडली रतन घुगे असे जखमी वृद्धाचे नाव असून त्याच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.
विशेष म्हणजे गावातील पाणीटंचाईच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दोन दिवसापूर्वीच ग्रामस्थांनी अंबाजोगाईच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमर उपोषण सुरू केले होते त्यानंतर उपजिल्हाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकारी आणि तहसीलदारांना आवश्यक सूचना देत गावात पिण्याच्या पाण्यासाठी बोर घेण्याची नियोजन केले होते.
मात्र पाणीटंचाईचा प्रश्न सुटण्याआधीच ही दुर्दैवी घटना घडली आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास रतन घुगे पाण्याच्या शोधात विहिरीकडे गेले होते यावेळी अंदाज न आल्याने ते विहिरीत पडले घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना विहिरीबाहेर काढले गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
भीषण दुष्काळामुळे केज तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण तीव्रता असल्याचे समोर येत आहे लाडे गावातील या घटनेमुळे ग्रामीण भागातील पाणीटंचाईचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासनाने केवळ आश्वासनावर न थांबता पाणी प्रश्न तातडीने सोडवावा अशी मागणी जनतेतून होत आहे

