केज प्रतिनिधी:
केज तालुक्यात पावसाअभावी शेती आणि शेतकरी अडचणीत सापडले असून, तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, जनावरांसाठी दावणीला चारा उपलब्ध करून द्यावा, तसेच तालुक्यातील अर्धवट विकासकामे तातडीने पूर्ण करावीत, अशा विविध मागण्यांचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले.मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने महायुती सरकारच्या विरोधात १ सप्टेंबर ते १७ सप्टेंबरदरम्यान मराठवाडाव्यापी ‘तुमसे ना हो पायेगा’ जनआंदोलन राबविण्यात येत आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवार, दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी केज तहसील कार्यालयात हे निवेदन सादर करण्यात आले.शिवसेना नेते तथा माजी विरोधी पक्षनेते आमदार आंबादास दानवे, संपर्कप्रमुख परशुराम जाधव आणि जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, तालुकाप्रमुख अशोक जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
केज तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी
तालुक्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने खरीप पिकांवर संकट निर्माण झाले आहे. अनेक भागांत पिकांची वाढ खुंटली असून, शेतकऱ्यांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने परिस्थितीची तातडीने दखल घेऊन केज तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आवश्यक मदत द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.तसेच पावसाअभावी जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता असल्याने जनावरांना दावणीला चारा उपलब्ध करून द्यावा, अशीही मागणी करण्यात आली.
अर्धवट कामे पूर्ण करण्याची मागणी
केज तालुक्यात विविध विभागांतील अनेक विकासकामे अर्धवट अवस्थेत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला. ही कामे नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असल्याने संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष घालून अर्धवट कामे पूर्ण करावीत, अशी मागणी करण्यात आली.सार्वजनिक बांधकाम उपविभागातील अधिकारी माहिती लपवत असल्याचा आरोप करत, संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली.
ग्रामीण रुग्णालयातील सुविधांकडे लक्ष देण्याची मागणी
केज येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची हेळसांड होत असल्याचा आरोप करण्यात आला. रुग्णांना आवश्यक आरोग्य सुविधा वेळेत मिळाव्यात, रुग्णालयातील समस्या दूर कराव्यात आणि रुग्णांची गैरसोय थांबवावी, अशी मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली.यावेळी जिल्हा सहसंघटक दिलीप जाधव, तालुका सचिव आप्पासाहेब कांबळे, तालुका संघटक अमोल चौधरी, उपतालुका प्रमुख तानाजी धस, उद्भव उगलमुगले, मधुकर अंधारे, मारोती गव्हाणे, अंगद देशमुख, पप्पू कोल्हे, कृष्णा केदार, अनिकेत शिंदे, राजेभाऊ मोटे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.शासनाने या मागण्यांची तातडीने दखल घेऊन केज तालुक्यातील शेतकरी, पशुपालक आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

