कडा | उपसंपादक संदीप सोनवणे
कडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रिक्त झालेल्या सभापती आणि उपसभापती पदासाठी बुधवारी (९ सप्टेंबर) विशेष निवडणूक पार पडली. या निवडणुकीत सभापतीपदी कडा येथील संजय नाना ढोबळे, तर उपसभापतीपदी पिंपळा येथील माजी उपसरपंच रामदास भगवान शेंडगे यांची अविरोध निवड झाली. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवे संचालक मंडळ १४ मे २०२३ रोजी अस्तित्वात आले होते. त्यावेळी रमजान तांबोळी यांची सभापतीपदी, तर नामदेव धोंडे यांची उपसभापतीपदी अविरोध निवड झाली होती.
पक्षांतर्गत नियोजित कार्यकाळानुसार रमजान तांबोळी आणि नामदेव धोंडे यांनी २३ ऑगस्ट रोजी आपल्या पदांचे राजीनामे दिले. त्यामुळे सभापती आणि उपसभापती ही दोन्ही पदे रिक्त झाली होती.या रिक्त पदांसाठी बुधवार, ९ सप्टेंबर रोजी कडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. निवडणूक प्रक्रियेदरम्यान सभापतीपदासाठी ग्रामपंचायत सर्वसाधारण गटातून निवडून आलेले कडा येथील रहिवासी संजय नाना ढोबळे यांनी अर्ज दाखल केला.
त्यांच्या अर्जाला विरोधात कोणताही दुसरा अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे सभापतीपदी त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.त्याचप्रमाणे उपसभापतीपदासाठी सेवा सहकारी सोसायटी (वि.जा./भ.ज.) संवर्गातून निवडून आलेले पिंपळा येथील माजी उपसरपंच रामदास भगवान शेंडगे यांनी अर्ज दाखल केला. या पदासाठीही केवळ एकच अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची उपसभापतीपदी अविरोध निवड करण्यात आली.
आष्टीच्या सहाय्यक निबंधक पूजा सांगळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. तर कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव हनुमंत गळगाटे यांनी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून निवडणूक प्रक्रियेची जबाबदारी सांभाळली.सभापती आणि उपसभापती पदासाठी निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे संचालक मंडळ तसेच उपस्थितांनी अभिनंदन केले.
बाजार समितीच्या पुढील कामकाजात शेतकरी, व्यापारी आणि बाजार समितीशी संबंधित घटकांच्या हिताला प्राधान्य देत प्रभावीपणे काम करण्याची अपेक्षा नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या कृषी मालाच्या खरेदी-विक्रीच्या दृष्टीने महत्त्वाची संस्था असल्याने बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदावरील नव्या नियुक्त्यांकडे शेतकरी व बाजार समितीशी संबंधित घटकांचे लक्ष लागले आहे.
संजय ढोबळे आणि रामदास शेंडगे यांच्या निवडीमुळे बाजार समितीच्या आगामी कामकाजाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


