Tuesday, November 24, 2026
Homeराजकारणबीड जिल्ह्याचा मान उंचावला! डॉ. राजेंद्र सानप यांना महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय ‘ग्रंथ...

बीड जिल्ह्याचा मान उंचावला! डॉ. राजेंद्र सानप यांना महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय ‘ग्रंथ मित्र’ पुरस्कार जाहीर!

Spread the love

३३ वर्षांच्या ग्रंथालय चळवळीतील उल्लेखनीय कार्याची शासनाकडून दखल; बीड जिल्ह्यातून हा बहुमान मिळवणारे पहिले मानकरी

बीड | प्रतिनिधी

ग्रंथालय चळवळीत तब्बल ३३ वर्षांपासून अविरतपणे कार्यरत राहून वाचनसंस्कृतीच्या संवर्धनासाठी मोलाचे योगदान देणारे डॉ. राजेंद्र मुरलीधर सानप यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन २०२४-२५ चा राज्यस्तरीय ‘डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता (ग्रंथ मित्र)’ पुरस्कार जाहीर झाला आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि ग्रंथालय संचालनालयाच्या माध्यमातून दिला जाणारा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाल्याने बीड जिल्ह्याच्या शैक्षणिक, साहित्यिक आणि ग्रंथालय क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

डॉ. राजेंद्र सानप यांनी गेल्या ३३ वर्षांपासून ग्रंथालय चळवळीला वाहून घेतले असून ग्रामीण आणि शहरी भागात वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. शासनाच्या ‘गाव तिथे ग्रंथालय’ या धोरणानुसार बीड जिल्ह्यात सार्वजनिक ग्रंथालयांची चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. केवळ ग्रंथालयांची उभारणी आणि विकास एवढ्यापुरतेच त्यांचे कार्य मर्यादित नसून सार्वजनिक ग्रंथालयांसमोरील विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी वेळोवेळी जनआंदोलनाच्या माध्यमातून संघर्षही केला आहे.

डॉ. सानप हे बीड जिल्हा ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष, मराठवाडा विभाग ग्रंथालय संघाचे माजी कोषाध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे सदस्य म्हणून कार्यरत राहिले आहेत. याशिवाय श्रीसंत भगवानबाबा व श्रीसंत वामनभाऊ प्रतिष्ठान, इंद्रप्रस्थ कॉलनी, बीडचे अध्यक्ष, स्व. श्रीमती जानकीदेवी सानप सार्वजनिक वाचनालय, सावरगाव (घाट), ता. पाटोदा येथील सचिव आणि गुरुवर्य भगवान महाराज सार्वजनिक वाचनालय, बीडचे संस्थापक म्हणूनही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. विशेषतः ग्रंथालय चळवळीच्या माध्यमातून सामान्य वाचकांना वाचनाची संधी उपलब्ध करून देणे, ग्रामीण भागात ज्ञानाची दारे खुली करणे आणि सार्वजनिक ग्रंथालयांचे प्रश्न शासनदरबारी मांडणे यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या याच दीर्घकालीन कार्याची आणि समर्पणाची महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करून दखल घेतली आहे.

बीड जिल्ह्यातून राज्यस्तरीय ‘ग्रंथ मित्र’ पुरस्कार मिळविणारे पहिले मानकरी ठरल्याचा बहुमान डॉ. राजेंद्र सानप यांना मिळाल्याने ही संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. त्यांच्या या यशामुळे ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्त्यांना नवी प्रेरणा मिळणार असून वाचनसंस्कृतीच्या प्रसारासाठी काम करणाऱ्यांचा उत्साह निश्चितच वाढणार आहे.

डॉ. राजेंद्र मुरलीधर सानप यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल ग्रंथालय क्षेत्रातील पदाधिकारी, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, मित्रपरिवार आणि बीड जिल्ह्यातील विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सर्व बातम्या

Recent Comments