केज/ प्रतिनिधी :
नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक श्री. बबनभैय्या लोमटे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अंबाजोगाई शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. त्यांच्या या निवडीमुळे अंबाजोगाई शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक कार्याला नवी दिशा आणि बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या निवडीनिमित्त अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे नेते रमेशराव आडसकर यांनी बबनभैय्या लोमटे यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी ॲड. बालासाहेब इंगळे, संतोष काळे, भारजकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनीही लोमटे यांच्या निवडीचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या.बबनभैय्या लोमटे हे नगरसेवक तसेच उपनगराध्यक्ष म्हणून अंबाजोगाई शहराच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत. नागरिकांच्या प्रश्नांची जाण, लोकांशी असलेला संपर्क आणि संघटनात्मक कामाचा अनुभव या बाबींच्या जोरावर त्यांच्यावर पक्षाने शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.शहराध्यक्षपदाच्या माध्यमातून पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेणे, युवकांना पक्षाच्या प्रवाहात सहभागी करून घेणे आणि पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविणे, अशी अपेक्षा त्यांच्या निवडीतून व्यक्त होत आहे.या निवडीमुळे अंबाजोगाई शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, बबनभैय्या लोमटे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला शहरात नवी उभारी मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.

