राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त डॉ. कविताताई गीते-कराड यांचा मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने सन्मान
केज / प्रतिनिधी
केज तालुक्यातील पात्र शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणाला मराठवाडा शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन प्रशिक्षणार्थी शिक्षकांना मार्गदर्शन केले. यावेळी मराठवाडा शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस ॲड. राजकुमार कदम सर, जिल्हा सचिव गणेश आजबे सर, तालुकाध्यक्ष मस्के सर आणि बाळासाहेब वळे सर उपस्थित होते.
तत्पूर्वी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते डॉ. कविताताई गीते-कराड यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान झाल्याबद्दल मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या या राष्ट्रीय स्तरावरील गौरवामुळे संपूर्ण देशात बीड जिल्ह्याची मान उंचावली असल्याची भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. यावेळी डॉ. कविताताई गीते-कराड यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
त्यानंतर साने गुरुजी निवासी विद्यालय, केज येथे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट), अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणाच्या वर्गाला पदाधिकाऱ्यांनी भेट दिली.यावेळी राज्य सरचिटणीस ॲड. राजकुमार कदम सर आणि जिल्हा सचिव गणेश आजबे सर यांनी उपस्थित शिक्षकांशी संवाद साधत शिक्षकांचे विविध प्रश्न, वेतनश्रेणी प्रशिक्षणाचे महत्त्व तसेच सेवाविषयक बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले. शिक्षकांनी आपल्या हक्कांबाबत जागरूक राहण्याबरोबरच शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठीही सातत्याने प्रयत्नशील राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, मराठवाडा शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस ॲड. राजकुमार कदम सर आणि जिल्हा सचिव गणेश आजबे सर यांचे साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या वतीने स्वागत करण्यात आले. या भेटीमुळे प्रशिक्षणार्थी शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. शिक्षकांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मराठवाडा शिक्षक संघ सदैव तत्पर असल्याचा विश्वास यावेळी संघाच्या पदाधिकाऱ्यांसह प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी व्यक्त केला.

