केज / प्रतिनिधी
तालुक्यातील चिंचोली माळी येथील पाझर तलावाच्या पडीक जागेवर कत्तल करण्याच्या उद्देशाने विक्रीसाठी बांधून ठेवलेल्या १२ बैल आणि ३ गायी अशा एकूण १५ गोवंशीय जनावरांची केज पोलिसांनी सुटका केली. १३ नोव्हेंबर रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास केलेल्या या कारवाईत पोलिसांनी ३ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून, सर्व जनावरांची गोशाळेत रवानगी करण्यात आली आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चिंचोली माळी येथील पाझर तलावाच्या पडीक जागेवर गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी बांधून ठेवल्याची माहिती केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक अमिरोद्दीन इनामदार आणि पोलीस कर्मचारी नितीन वारे यांना सोबत घेऊन पहाटे साडेचार वाजता घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता १२ बैल आणि ३ गायी अशी एकूण १५ गोवंशीय जनावरे बांधून ठेवल्याचे आढळून आले. पोलिसांनी तत्काळ या जनावरांची सुटका करून तीन लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. त्यानंतर सर्व जनावरांची गोशाळेत व्यवस्था करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राहुल तरकसे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७१०/२०२६ अन्वये प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० मधील कलम ११(१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी बजरंग मुंडे करीत आहेत.
गोवंशीय जनावरांची कत्तल करण्याच्या उद्देशाने त्यांना बेकायदेशीररीत्या डांबून ठेवल्याप्रकरणी संबंधित आरोपींचा शोध घेऊन त्यांना लवकरच ताब्यात घेतले जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.केज पोलिसांच्या या कारवाईमुळे कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या १५ गोवंशीय जनावरांना जीवदान मिळाले आहे.

