केज / प्रतिनिधी :केज तालुक्यातील मस्साजोग येथील प्रवीण कन्स्ट्रक्शनच्या हॉटमिक्स प्लांटवरून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ७५ हजार रुपये किमतीच्या सात मोटारी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कृष्णा किरण देशमुख यांच्या फिर्यादीवरून केज पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून ते दि. १९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या दरम्यान ही चोरी झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. प्रवीण कन्स्ट्रक्शनच्या हॉटमिक्स प्लांटवर ठेवलेल्या एकूण सात मोटारी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या. या मोटारींची एकूण किंमत सुमारे ७५ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.या प्रकरणी केज पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार प्रकाश मुंडे पुढील तपास करीत आहेत.
गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणीचोरीच्या घटनेनंतर गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण उंबरे, सहाय्यक फौजदार पी. टी. चव्हाण, जमादार बाळासाहेब अहंकारे व नितीन वारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून, त्याआधारे अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण उंबरे यांनी दिली.

