ऊसाला ४२०० रुपये प्रतिटन दर द्या; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखांची मदत करा!पाडळसिंगी टोलनाक्यावर शेतकऱ्यांचे भव्य रास्ता रोको आंदोलन; धुळे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक ठप्पबीड | प्रतिनिधीऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाला प्रतिटन ४ हजार २०० रुपये दर देण्यात यावा, तसेच दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी बीड जिल्ह्यातील पाडळसिंगी टोलनाका येथे शेतकरी संघटनांच्या वतीने तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य भाव मिळावा, यासाठी उसाला प्रतिटन ४२०० रुपये दर जाहीर करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. त्याचबरोबर यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने हेक्टरी एक लाख रुपये मदत तातडीने द्यावी, अशी मागणीही करण्यात आली.या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला मोठ्या संख्येने शेतकरी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, विविध शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. आंदोलन गेल्या दोन तासांपासून सुरू असल्याने राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. प्रवासी वाहने, मालवाहू ट्रक, खासगी वाहने आणि इतर वाहनांना याचा फटका बसला.आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच प्रशासकीय अधिकारीही आंदोलनस्थळी दाखल झाले असून आंदोलकांशी चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनएकीकडे शेतीचा वाढता उत्पादन खर्च, ऊस दराचा प्रश्न आणि दुसरीकडे दुष्काळामुळे निर्माण झालेली आर्थिक परिस्थिती यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली आहे.या रास्ता रोको आंदोलनाचे ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपलेले दृश्य सध्या चर्चेचा विषय ठरत असून पाडळसिंगी टोलनाक्यावरील आंदोलनाची व्याप्ती या दृश्यांमधून स्पष्ट होत आहे. आता शासन आणि प्रशासन या मागण्यांवर काय भूमिका घेते, याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.
RELATED ARTICLES


