भीषण पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थितीचे नियोजन करण्याचे मोठे आव्हान
केज / प्रतिनिधी

केजचे तहसीलदार राजेश गिड्डे यांच्या अपघाती निधनानंतर तहसीलदारपदाचा कार्यभार भारत गंगावणे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. त्यांचा कार्यकाळ अल्पकालीन ठरल्यानंतर नायब तहसीलदार अशोक भंडारे यांच्याकडे तात्पुरता कार्यभार देण्यात आला होता. अखेर केज तहसील कार्यालयाला पूर्णवेळ तहसीलदार मिळाला असून नितीन गर्जे यांनी आज तहसीलदारपदाचा अधिकृत पदभार स्वीकारला.
केज तालुक्यात सध्या भीषण पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असून अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेतकरी, शेतमजूर तसेच सर्वसामान्य नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर नितीन गर्जे यांच्यासमोर तालुक्यातील पाणीटंचाई निवारण आणि दुष्काळी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे मोठे आव्हान असणार आहे.पाणीटंचाईग्रस्त गावांची प्रत्यक्ष पाहणी करून टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन, पाणी उपलब्धतेचे योग्य व्यवस्थापन, प्रशासकीय यंत्रणा गतिमान करणे तसेच दुष्काळी उपाययोजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचविणे, या प्रमुख बाबींवर नव्या तहसीलदारांना लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.
यासोबतच शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांना प्राधान्य देत महसूल प्रशासन अधिक गतिमान करण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.पूर्णवेळ तहसीलदार मिळाल्यामुळे तालुक्यातील प्रलंबित प्रशासकीय प्रश्नांना गती मिळेल आणि पाणीटंचाई व दुष्काळाच्या संकटावर प्रभावी उपाययोजना होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नितीन गर्जे यांच्या कार्यकाळात प्रशासन जनतेच्या प्रश्नांना कितपत न्याय देते, याकडे आता संपूर्ण केज तालुक्याचे लक्ष लागले आहे.

