आष्टी प्रतिनिधी/ संदीप सोनवणे
आष्टी तालुक्यातील नागतळा येथील प्रसिद्ध श्रीक्षेत्र नागनाथ देवस्थान जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. दरवर्षी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या श्रद्धेने यात्रेसाठी येथे दाखल होतात. यंदाही यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली असून, ग्रामस्थ, यात्रा कमिटी आणि ग्रामपंचायतीकडून यात्रा उत्साहात व सुरळीत पार पडण्यासाठी विविध व्यवस्था करण्यात येत आहेत.
यात्रेदरम्यान आष्टी तसेच आंमळनेर पोलीस ठाण्याच्या वतीने कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. भाविकांना तसेच पालखीला रात्रीच्या वेळी पुरेसा प्रकाश मिळावा यासाठी मंदिर परिसर आणि पालखी मार्गावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिर व सभामंडपावर आकर्षक विद्युत सजावटही करण्यात येणार आहे.
भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून, यात्रेसाठी येणाऱ्या दुकानदारांना नियोजनबद्ध पद्धतीने जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मिठाई, स्टेशनरी, फुले-हार व पेढे विक्रेत्यांसाठी स्वतंत्र रांगा करण्यात आल्याने यात्रेतील गर्दीचे व्यवस्थापन सुलभ होणार आहे.
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ८ ते ११ वाजेपर्यंत पालखी छबिना होणार आहे. रात्री ८ वाजता गुरुवर्य महंत काशीनाथ महाराज यांच्या हस्ते पालखीला नारळ वाढवून छबिन्याला सुरुवात होईल. ढोल-ताशा, बँड पथक, डीजे, टाळ-मृदंगाच्या गजरात पालखी गावातून भव्य मिरवणुकीने फिरून मंदिरात दाखल होईल. यावेळी आकर्षक आतषबाजीही पाहायला मिळणार आहे.
सोमवार, ३१ ऑगस्ट रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून दिवसभर यात्रोत्सव रंगणार आहे. मंदिराच्या गाभाऱ्यापासून सभामंडपापर्यंत आकर्षक फुलांची सजावट करण्यात येणार आहे. मोठ्या संख्येने भाविक नागतळा नगरीत दाखल होणार असल्याने परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होणार आहे.
श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाचा संगम असलेल्या श्रीक्षेत्र नागनाथ देवस्थान नागतळा यात्रेस भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रामस्थ व यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

