डिजिटल बीड न्यूज प्रतिनिधी |
जिल्ह्यातील बँकांच्या कामकाजाचा व शासकीय योजनांच्या कर्जवाटपाचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याकडून सविस्तर आढावा!जिल्हा सल्लागार समितीची (District Consultative Committee – DCC) सप्टेंबर २०२६ अखेरच्या तिमाहीची बैठक दि. १८ नोव्हेंबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी श्री. विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे संपन्न झाली.
बैठकीत जिल्ह्यातील बँकांच्या कर्जवाटपाची प्रगती, विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी, पीक कर्ज वितरण तसेच बँकांकडे प्रलंबित असलेल्या कर्ज प्रस्तावांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पात्र शेतकरी, पशुपालक, महिला बचत गट, छोटे व्यावसायिक, पथविक्रेते व नवउद्योजकांना वेळेत कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश सर्व बँकांना दिले.
विशेषतः पीक कर्ज वाटपातील कमी प्रगतीबाबत नाराजी व्यक्त करत पात्र शेतकऱ्यांना प्राधान्याने कर्ज वितरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, PMFME, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना, PM SVANidhi, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना आणि महिला बचत गटांच्या प्रलंबित कर्ज प्रस्तावांचा तातडीने निपटारा करण्याचे निर्देश देण्यात आले.प्रलंबित कर्ज प्रकरणांचा नियमित आढावा घेण्यासाठी संबंधित विभागांनी बँकनिहाय माहितीची Google Sheet तयार करून अद्ययावत ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद श्री. जितीन रहमान, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक श्री. तात्यासाहेब मारकड, भारतीय रिझर्व्ह बँकेचे अग्रणी जिल्हा अधिकारी श्री. निशांत यादव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. सुभाष साळवे, जिल्हा अग्रणी बँकेचे मुख्य प्रबंधक श्री. सचिन गांगुर्डे यांच्यासह विविध बँकांचे जिल्हा समन्वयक व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
“शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचविणे आणि जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला गती देणे, यासाठी सर्व बँकांनी समन्वयाने व जबाबदारीने काम करावे,” असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. विवेक जॉन्सन यांनी यावेळी केले.

