केज / प्रतिनिधी
नांदूरघाट येथे जुगार खेळणारे चौघे पकडले; प्रशांत नगरमध्ये प्रतिबंधित गुटखा जप्त
केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या (डीबी) पथकाने अवघ्या दोन दिवसांत दोन मोठ्या कारवाया करत अवैध धंद्यांविरोधात धडक मोहीम राबवली आहे.१७ नोव्हेंबर रोजी दुपारी नांदूरघाट येथील बाजारतळावर छापा टाकून सोरट नावाचा जुगार खेळणाऱ्या शिवा शिंदे, दादा चंद्रकांत पवार, युवराज आबासाहेब पवार आणि श्याम प्रभू शिंदे या चौघांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण १ लाख १ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी गुन्हा क्रमांक ७१८/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर १८ नोव्हेंबर रोजी प्रशांत नगर परिसरात छापा टाकून सागर बाजीराव चाळक यांच्या घरामागील मोकळ्या जागेत लपवून ठेवलेला प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधी तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला. या मुद्देमालाची किंमत १ लाख ८ हजार ८०५ रुपये असल्याची माहिती आहे. याप्रकरणी सागर चाळक यांच्याविरुद्ध भा.न्या.सं. कलम १२३, २७४, २७५ व २२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या दोन्ही कारवायांमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण उंबरे, पोलीस उपनिरीक्षक अजिमुद्दीन इनामदार, हेड कॉन्स्टेबल बाळासाहेब अहंकारे, संगीता हनवते आणि पोलीस कॉन्स्टेबल नितीन वारे यांनी सहभाग घेतला. पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या या कारवायांमुळे अवैध धंदे चालकांमध्ये खळबळ उडाली आहे

