- नांदूरघाट ता. केज जि. बीड प्रतिनिधी:
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी येथील ‘ग्रामविकास फाउंडेशन नांदूरघाट’च्या पुढाकाराने आज ‘एक तास गावासाठी’ या प्रेरणादायी उपक्रमांतर्गत भव्य स्वच्छता मोहीम अत्यंत उत्साहात राबवण्यात आली. छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक ते श्री हनुमान मंदिर या मुख्य परिसरामध्ये ही मोहीम पार पडली.
तरुणाईचा पुढाकार आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
आजच्या या स्वच्छता मोहिमेत गावातील सर्व नागरिकांनी आणि विशेषतः तरुण युवकांनी मोठ्या संख्येने व उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. तरुणांनी हातामध्ये झाडू घेऊन रस्त्यावरील कचरा साफ केला, तर काही ठिकाणी यंत्राच्या मदतीने रस्ते चकाचक करण्यात आले. - युवकांनी एखादी गोष्ट जर आपल्या हातामध्ये घेतली, तर ती गावाच्या हिताची आणि कल्याणाची ठरू शकते, याचे उत्तम उदाहरण या मोहिमेतून दिसून आले. युवकांचा हा उत्साह येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी निश्चितच एक आदर्श प्रेरणा ठरणार आहे.
’स्वच्छ नांदूर, सुंदर नांदूर’चा संकल्प
ग्रामविकास फाउंडेशन, नांदूरघाट यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेले हे अभियान गावाला परिवर्तनाची नवी दिशा देणारे ठरेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला. - “आपल्या सर्वांच्या श्रमदानातून आणि एकजुटीतून ‘स्वच्छ नांदूर – सुंदर नांदूर’ ही संकल्पना नक्कीच प्रत्यक्षात साकार होईल,” असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या मोहिमेच्या यशस्वी आयोजनाबद्दल ग्रामविकास फाउंडेशनच्या वतीने सहभागी झालेले सर्व तरुण, ज्येष्ठ नागरिक आणि गावकऱ्यांचे मनापासून आभार मानून त्यांचे जाहीर - अभिनंदन करण्यात आले.
”चला, एकत्र येऊया… गाव स्वच्छ ठेवूया… सुंदर नांदूर घडवूया!” या उद्दिष्टाने सुरू झालेल्या या मोहिमेमुळे नांदूरच्या विकासाची एक नवी सुवर्णपहाट नक्कीच उगवेल, असा आशावाद गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.



