निवेदन सादर करूनही महावितरणकडून दखल नाही; दहा दिवसांपासून ट्रान्सफॉर्मर बंद, पिण्याच्या पाण्यासाठी वणवण, बाराभाई व महादेव वस्तीतील नागरिक आक्रमक

Spread the love

डिजिटल बीड न्यूज | केज

बातमी खरी, आवाज जनतेचा– प्रतिनिधी

केज तालुक्यातील गप्पेवाडी येथील बाराभाई व महादेव वस्तीमध्ये मागील दहा दिवसांपासून ट्रान्सफॉर्मर बंद असल्याने नागरिकांना तीव्र गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. ट्रान्सफॉर्मर बंद पडल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला असून पाणीपुरवठा योजना देखील ठप्प झाली आहे. परिणामी ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असून महिला, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

स्थानिक नागरिकांनी यापूर्वी अनेक वेळा महावितरण कार्यालयाकडे तक्रारी व निवेदने सादर केली होती. मात्र संबंधित विभागाकडून अद्याप कोणतीही ठोस दुरुस्ती अथवा कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.याशिवाय बाराभाई वस्तीतील विद्युत खांब व तारा देखील अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या परिस्थितीकडे दुर्लक्ष झाल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.याबाबत ग्रामस्थ नामदेव केदार यांनी महावितरण उपविभाग कार्यालय, केज येथे निवेदन सादर करून तात्काळ नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे, सुरळीत वीजपुरवठा सुरू करणे तसेच जीर्ण विद्युत खांब व तारा बदलण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, वारंवार निवेदने सादर करूनही प्रशासनाकडून अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने बाराभाई व महादेव वस्तीतील नागरिक आक्रमक झाले असून तातडीने प्रश्न निकाली न काढल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजांशी संबंधित असलेल्या या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *