केज digital beed
केज तालुक्यातील उमरी सज्जाचे तलाठी परमेश्वर फलके याला आठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. उमरी येथील एका शेतकऱ्याच्या सहमतीच्या वाटणीपत्राची सातबारा उताऱ्यावर नोंद करून फेरफार मंजूर करण्यासाठी तलाठी फलके यांनी आठ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.लाच देण्याची इच्छा नसल्याने संबंधित शेतकऱ्याने बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर पोलीस निरीक्षक समाधान कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला.
गुरुवारी (दि. ८ ऑक्टोबर) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास केज तहसील कार्यालयाच्या पाठीमागील भागातील तलाठी सज्जाच्या कार्यालयात शेतकऱ्याकडून आठ हजार रुपये स्वीकारताना परमेश्वर फलके याला पथकाने रंगेहाथ पकडले. रात्री उशिरापर्यंत केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

