केज | प्रतिनिधी डिजिटल बीड
‘हरित धाराशिव 2.0’ या धाराशिव जिल्हा प्रशासनाच्या महत्त्वाकांक्षी वृक्षलागवड उपक्रमाला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली असून, या उपक्रमात तज्ज्ञ परीक्षक म्हणून योगदान देणारे वनस्पतीशास्त्रज्ञ प्रो. डॉ. नवनाथ काशीद यांचा धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.धाराशिव जिल्हा प्रशासनाच्या वतीने १४ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये एकाच दिवसात तब्बल १० लाख वृक्षांची लागवड करण्यात आली.
मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आलेल्या या वृक्षलागवड उपक्रमाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाल्याची माहिती देण्यात आली आहे.या ऐतिहासिक उपक्रमाच्या अंमलबजावणीदरम्यान जिल्हा प्रशासन आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या समितीच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ परीक्षक म्हणून वनस्पतीशास्त्रज्ञांची नियुक्ती करण्यात आली होती.
वृक्षलागवडीची प्रक्रिया, नोंदी आणि आवश्यक बाबींची तपासणी करण्यामध्ये तज्ज्ञ परीक्षकांनी महत्त्वाची भूमिका बजावली.या उपक्रमाच्या नोंदी आणि आवश्यक पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १० लाख वृक्षलागवडीची जागतिक विक्रमाच्या नोंदीत नोंद झाली. या विशेष कामात तज्ज्ञ परीक्षक म्हणून योगदान दिल्याबद्दल बाबुरावजी आडसकर महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्रज्ञ प्रो. डॉ. नवनाथ काशीद यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते प्रो. डॉ. नवनाथ काशीद यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. पर्यावरण संवर्धन, वृक्षलागवड आणि वैज्ञानिक पद्धतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमात तज्ज्ञ म्हणून त्यांनी दिलेल्या योगदानाची यावेळी दखल घेण्यात आली.‘
हरित धाराशिव 2.0’च्या माध्यमातून एकाच दिवशी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतानाच या उपक्रमाने मोठ्या प्रमाणावर लोकसहभागातून वृक्षलागवड करण्याची दिशा दाखवली आहे. या उपक्रमाची जागतिक विक्रमाच्या नोंदीत नोंद झाल्याने धाराशिव जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
दरम्यान, या विशेष उपक्रमात तज्ज्ञ परीक्षक म्हणून योगदान देऊन जागतिक विक्रमाच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल प्रो. डॉ. नवनाथ काशीद यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. त्यांच्या या गौरवामुळे केज तालुक्यासह शैक्षणिक आणि वनस्पतीशास्त्र क्षेत्रातूनही समाधान व्यक्त केले जात आहे.













