केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथे विनापरवाना अवैध सावकारी व्यवहार करणाऱ्यावर सहकार विभाग आणि पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने मोठी कारवाई केली आहे.गुरुवार,दि. १९ नोव्हेंबर २०२६ रोजी करण्यात आलेल्या या धाडीत मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत.
सहकार विभागाकडे केज तालुक्यातील अवैध सावकारी व्यवहारा बाबत तक्रार प्राप्त झाली होती.या तक्रारीच्या चौकशीच्या अनुषंगाने महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ च्या कलम १६ अंतर्गत जिवाचीवाडी ता.केज, जि.बीड येथील गैर अर्जदार राजाभाऊ सुखदेव केदार यांच्या राहत्या घराची झडती घेण्यात आली.झडतीत आढळलेला मुद्देमाल-तपासणी दरम्यान अवैध सावकारी व्यवहाराबाबत संशयित असलेले व्याज उल्लेख असलेले हिशोब,तब्बल ५५ कोरे धनादेश (ब्लँक चेक) आणि ०४ खरेदी खतांच्या प्रती पुढील चौकशीसाठी पथकाने ताब्यात घेतल्या आहेत.
या प्रकरणी सावकारी कायद्यांतर्गत पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.सदर कारवाई लातूरचे विभागीय सहनिबंधक (सहकारी संस्था) नानासाहेब चव्हाण आणि बीडचे जिल्हा उपनिबंधक सतिष तोटावार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी या मोहिमेसाठी प्रशासकीय मदत व पोलीस संरक्षण पुरवले.पथक प्रमुख म्हणून केजचे सहायक निबंधक श्री.शिवराज नेहरकर यांनी काम पाहिले,तर पथक सहायक म्हणून श्रीमती एम.एस. वहावळे आणि व्ही.के. इंगळे यांनी सहभाग घेतला.सहाय्यक निबंधक श्री.शिवराज नेहरकर यांच्या नेतृत्वाखाली ही तिसरी कारवाई आहे. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्याची ओळख आहे.
त्यांच्या या कारवाई बद्दल गोर गरीब जनतेला दिलासा मिळाला असल्याचे दिसून येत आहे.अवैध सावकारी करणाऱ्यां वर कठोर कारवाई करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन सहायक निबंधक श्री.शिवराज नेहरकर यांच्याकडून करण्यात आले आहे. अशा व्यवहारांबाबत जिल्हा उपनिबंधक कार्यालय,बीड किंवा तालुक्यातील सहायक निबंधक कार्यालयाकडे गोपनीय तक्रार दाखल करावी; तक्रारदाराचे नाव धाडीच्या कार्यवाहीपर्यंत पूर्णपणे गुप्त ठेवले जाईल, अशी माहिती त्यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

