Tuesday, November 24, 2026
Homeबीड जिल्हारेणुका कला केंद्रात अल्पवयीन मुलीचा छळ; तिघांविरुद्ध पोक्सोसह गुन्हा

रेणुका कला केंद्रात अल्पवयीन मुलीचा छळ; तिघांविरुद्ध पोक्सोसह गुन्हा

Spread the love

केज / प्रतिनिधी : – केज तालुक्यातील बरड फाटा परिसरातील रेणुका कला केंद्रात एका अल्पवयीन मुलीला डांबून ठेवून तिच्यावर अत्याचारसदृश छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नोकरीचे आमिष दाखवून मुलीला वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यात आले. बनावट आधारकार्ड तयार करून तिचे वय अधिक दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर तिला ग्राहकांसमोर नाचण्यास भाग पाडून अनैतिक कृत्यांसाठी दबाव आणल्याची तक्रार पीडित मुलीने केली आहे. या प्रकरणी कला केंद्राची मालकीण, मालक आणि अन्य एका व्यक्तीविरुद्ध पोक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील गांगलवाडी येथील महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीला तिच्या ओळखीच्या प्रगती चहांदे (रा. चांदोली, ता. ब्रह्मपुरी, जि. चंद्रपूर) या महिलेने लातूर येथे नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी ३० जुलै २०२६ रोजी तिला अडीच हजार रुपये पाठविण्यात आले. त्यानंतर मुलगी लातूर येथे गेल्यानंतर तिला शिंदाडा येथील राधिका कला केंद्रात नेण्यात आले.

मात्र, वय कमी असल्याने तेथे काम देता येणार नसल्याचे सांगण्यात आले.त्यानंतर मुलीला कला केंद्राची मालकीण अंजली भरत चव्हाण (रा. चापडोहा, ता. जि. यवतमाळ) हिच्याकडे नेण्यात आले. पुढे धाराशिव जिल्ह्यातील येडशी येथील एका खोलीत ठेवून आधार केंद्राच्या माध्यमातून वय बदलून बनावट आधारकार्ड तयार करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

९ नोव्हेंबर २०२६ रोजी अंजली चव्हाण हिने या अल्पवयीन मुलीला केज तालुक्यातील बरड फाटा परिसरातील रेणुका कला केंद्रात आणले. तेथे मुलीचे वय कमी असल्याची माहिती असूनही बनावट आधारकार्डच्या आधारे तिला नृत्य करण्यास भाग पाडण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच तेथे येणाऱ्या ग्राहकांकडून तिच्यासोबत अश्लील वर्तन करण्यात आले आणि अनैतिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणण्यात आला.

मुलीने यास नकार दिल्यानंतर तिला एका खोलीत डांबून ठेवून स्वयंपाक, धुणीभांडी अशी कामे बळजबरीने करून घेतल्याचा आरोप आहे.या प्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून अंजली भरत चव्हाण, रेणुका कला केंद्राचे मालक डॉ. रामधन ढाकणे आणि सुजित शिनगारे यांच्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७१५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ७५, ७९, १४३(४), १४६, ३३७, ४४० तसेच पोक्सो कायद्यातील कलम ८ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून, कला केंद्राची मालकीण अंजली भरत चव्हाण हिला ताब्यात घेतल्याची माहिती आहे. अन्य आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. बनावट आधारकार्ड तयार करण्यात सहभागी असलेले तसेच मुलीचा छळ करणारे ग्राहक आणि इतर संबंधित व्यक्तींचाही तपासातून शोध घेतला जाण्याची शक्यता आहे.पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राकेश नेटके या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

digitalbeed
digitalbeedhttp://digitalbeed.in
DigitalBeed.in हे बीड जिल्हा तसेच महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या, सरकारी योजना, शेती, शिक्षण, नोकरी आणि तंत्रज्ञान विषयक माहिती देणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमचे उद्दिष्ट वाचकांपर्यंत अचूक, विश्वासार्ह आणि जलद बातम्या पोहोचवणे आहे. बीड जिल्ह्यातील केज, माजलगाव, अंबाजोगाई, परळी, गेवराई, आष्टी आणि इतर भागातील स्थानिक घडामोडी आम्ही सातत्याने प्रसिद्ध करतो. ताज्या अपडेटसाठी DigitalBeed.in नियमित वाचा आणि आमच्या सोशल मीडियावर देखील जोडलेले राहा.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सर्व बातम्या

Recent Comments