केज/प्रतिनिधी
एकीकडे भीषण दुष्काळाचे सावट, दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठी महिलांसह ग्रामस्थांची वणवण आणि तिसरीकडे प्रशासनाची कथित उदासीनता..
अशी संतापजनक परिस्थिती केज तालुक्यातील गप्पेवाडी-नामेवाडी येथे निर्माण झाली आहे.जलजीवन मिशन अंतर्गत असलेल्या विहिरीत पाणी उपलब्ध असतानाही केवळ पाईपलाईनच्या किरकोळ दुरुस्ती अभावी ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे.गप्पेवाडी- नामेवाडी ग्रुप ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक संतोष नागरगोजे यांच्या कथित निष्काळजी पणामुळे हा प्रश्न अधिकच चिघळल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून,संबंधित ग्रामसेवकाची चौकशी करून तातडीने कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
गावात पाण्याची गंभीर टंचाई असताना उपलब्ध जलस्रोतांचा उपयोग करून घेण्या ऐवजी पाईपलाईन दुरुस्तीचे काम प्रलंबित राहणे ही बाब ग्रामस्थांच्या संतापात भर घालणारी ठरत आहे.पाण्यासारख्या अत्यावश्यक सुविधे बाबत वारंवार तक्रारी करूनही प्रश्न मार्गी लागत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.ग्रामसेवक संतोष नागरगोजे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते फोनही उचलत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
तसेच ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात नियमित उपस्थिती नसणे आणि मुख्यालयी न राहता कारभाराकडे दुर्लक्ष करणे,असे आरोपही नागरिकांनी केले आहेत.’जनतेच्या तहानपेक्षा अधिकाऱ्यांची उदासीनता मोठी?’दुष्काळात पाण्यासाठी जनता होरपळत असताना प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करणे अपेक्षित आहे. मात्र, गप्पेवाडी- नामेवाडीतील परिस्थिती पाहता ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.ग्रामसेवकांच्या कथित वर्तनाबाबत आणि जबाबदारी झटकण्याच्या भूमिके बाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांशी असलेल्या कथित जवळीकीचा आधार घेत आपल्यावर कोणतीही कारवाई होणार नाही,अशा आविर्भावात संबंधित ग्रामसेवक वागत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.या आरोपांची वरिष्ठ प्रशासनाने निष्पक्ष चौकशी करावी,अशी मागणी होत आहे.
ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या-गप्पेवाडी-नामेवाडी येथील पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करावा.
जलजीवन मिशनच्या विहिरीपासून होणाऱ्या पाणीपुरवठ्यातील अडथळे दूर करून पाईपलाईनची दुरुस्ती करावी.
आवश्यकतेनुसार टँकर,बोअरवेल व इतर पर्यायी जलस्रोतांची व्यवस्था करावी.-ग्रामसेवक संतोष नागरगोजे यांच्या कामकाजाची व कथित निष्काळजी पणाची चौकशी करा.
आता आश्वासन नको, प्रत्यक्ष पाणी हवे!
गप्पेवाडीतील पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना प्रशासनाने आणखी किती दिवस नागरिकांची प्रतीक्षा पाहायची? पाणी उपलब्ध असूनही केवळ दुरुस्तीअभावी ग्रामस्थांना तहानलेले राहावे लागत असेल, तर ही प्रशासनासाठी निश्चितच लाजिरवाणी बाब आहे.
जिल्हाधिकारी आणि पंचायत समिती प्रशासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून नागरिकांना दिलासा द्यावा.अन्यथा पाणी प्रश्नावर ग्रामस्थांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्या शिवाय पर्याय राहणार नाही,असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.

