Wednesday, November 25, 2026
HomeUncategorizedडिगोळआंबा शिवारातील कोरड्या तलावात अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला!

डिगोळआंबा शिवारातील कोरड्या तलावात अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला!

Spread the love

५० ते ५५ वयोगटातील व्यक्तीची ओळख पटविण्याचे युसूफ वडगाव पोलिसांचे आवाहन; नागरिकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

केज प्रतिनिधी :

केज–अंबाजोगाई परिसरात खळबळ उडवणारी घटना समोर आली असून, युसूफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे डिगोळआंबा शिवारात कळंब–अंबाजोगाई राज्य महामार्गालगत असलेल्या कोरड्या तलावामध्ये एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. अंदाजे ५० ते ५५ वर्षे वयोगटातील या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसून, संबंधित व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी युसूफ वडगाव पोलिसांनी नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर मृत व्यक्तीच्या अंगात पांढऱ्या रंगाचा फाटलेला व अर्धवट जळालेला सदरा होता. तसेच ग्रे रंगाची चड्डी असून, त्यावर काळ्या व पिवळ्या रंगाचे पट्टे आहेत. चड्डीला लाल रंगाच्या कापडाचे ठिगळ लावलेले आहे. व्यक्तीच्या कमरेला लाल रंगाचा करदोडा असून, त्याला काळ्या, पांढऱ्या व पोपटी रंगाच्या तीन चाव्या असलेला दोर बांधलेला आढळून आला आहे.

याशिवाय मृतदेहाच्या बाजूला काळ्या रंगाच्या चामड्याच्या शूजची जोडी आढळली आहे. तसेच लाल चौकडीचा रुमाल असून, त्यामध्ये डेटॉल व मेडिमिक्स साबण आढळून आले आहेत. या वस्तूंच्या आधारे संबंधित व्यक्तीची ओळख पटविण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत.

ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे आवाहन

सदर वर्णनाशी मिळतीजुळती व्यक्ती आपल्या गावातून, परिसरातून किंवा कुटुंबातून बेपत्ता झाली असल्यास नागरिकांनी तातडीने युसूफ वडगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे यांनी केले आहे.

या व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी नागरिकांनी दिलेली माहिती पोलिसांसाठी महत्त्वाची ठरू शकते. त्यामुळे कोणाकडेही संबंधित व्यक्तीबाबत माहिती असल्यास ती पोलिसांना कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

संपर्कासाठी :

  • ९७३०९३४४१४
  • ९२२५०९२८३७

संदीप मांजरमे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन युसूफ वडगाव.

अनोळखी मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन युसूफ वडगाव पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सर्व बातम्या

Recent Comments