केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील कोल्हेवाडी येथे प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेत खोटे जिओ टॅग आणि अँगल कॅम्प फोटो जोडून शासनाची सुमारे ३.५० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा भाजपा केज तालुका सरचिटणीस तथा कोल्हेवाडी बुथ प्रमुख चंदुलाल विलास मिसाळ यांनी दिला आहे.
त्यांनी या संदर्भात केज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना लेखी निवेदन सादर केले आहे.निवेदनात म्हटले आहे की,कोल्हेवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य श्रीराम फुलचंद खांडेकर आणि त्यांचे वडील फुलचंद लक्ष्मण खांडेकर या दोन लाभार्थ्यांनी प्रत्यक्षात घरकुल बांधकाम केलेले नाही.केवळ पत्र्याचे शेड असताना खोटे अँगल कॅम्प फोटो आणि दुसऱ्या व्यक्तीचे फोटो जिओ टॅगमध्ये जोडून बांधकाम पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आले.
या माध्यमातून शासनाकडून सुमारे ३.५० लाख रुपयांच्या अनुदानाचा लाभ लाटण्यात आला आहे.या संपूर्ण प्रकरणात संबंधित अधिकारी आणि अभियंत्यांचे संगनमत असण्याची शक्यताही निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.प्रशासनाने प्रत्यक्ष स्थळपाहणी करून जिओ टॅग फोटोंची पडताळणी करावी, दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि शासनाची फसवणूक करून घेतलेले अनुदान तात्काळ वसूल करावे, अशी मागणी मिसाळ यांनी केली आहे.
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कारवाई न झाल्यास नाईलाजास्तव आमरण उपोषण करावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.या निवेदनाच्या प्रती बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.

