केज | प्रतिनिधी
गप्पेवाडी येथील बाराभाई वस्तीवरील ट्रान्सफॉर्मर मागील आठ दिवसांपासून बंद असल्याने परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. तसेच वस्तीवरील विद्युत खांब व तारा जीर्ण व धोकादायक अवस्थेत असून वारंवार तक्रारी करूनही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या गंभीर समस्येबाबत ग्रामस्थांच्या वतीने नामदेव केदार यांनी महावितरण उपविभाग कार्यालय, केज येथे निवेदन सादर करून तातडीने कार्यवाहीची मागणी केली. निवेदनात ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करून वीजपुरवठा सुरळीत करण्याबरोबरच धोकादायक खांब व जीर्ण तारा बदलण्याची मागणी करण्यात आली आहे.
वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून केवळ तात्पुरती मलमपट्टी करण्यात येत असून कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. ट्रान्सफॉर्मर बंद असल्याने पाणीपुरवठा योजना ठप्प झाली असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सदर समस्येची तात्काळ दखल घेऊन आवश्यक कार्यवाही न केल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. महावितरण प्रशासनाने याबाबत त्वरित पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.









Leave a Reply