बंकट स्वामी मठसंस्थान येथे ह.भ.प. महाराज मंडळींच्या उपस्थितीत आडसकर दाम्पत्याचा सत्कार
केज / प्रतिनिधी :
कार्तिकी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त अंबेजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे नेते रमेशराव आडसकर यांनी आज शनिवार, दि. २१ नोव्हेंबर रोजी सपत्नीक पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी सर्वांच्या सुख, समृद्धी आणि कल्याणासाठी प्रार्थना केली. त्यांच्या या पंढरपूर भेटीदरम्यान बंकट स्वामी मठसंस्थान येथे ह.भ.प. महाराज मंडळींच्या उपस्थितीत आडसकर दाम्पत्याचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.कार्तिकी एकादशी हा वारकरी संप्रदायासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि श्रद्धेचा उत्सव मानला जातो.
या पवित्र पर्वानिमित्त पंढरपूर नगरीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, राज्याच्या विविध भागांतून भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल होत आहेत. याच भक्तिमय वातावरणात रमेशराव आडसकर यांनी सपत्नीक श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले.दर्शनानंतर बंकट स्वामी मठसंस्थान येथे ह.भ.प. श्री हासेगावकर महाराज यांच्या समवेत रमेशराव आडसकर यांचा सपत्नीक पंढरपूरच्या परंपरेनुसार सत्कार करण्यात आला. यावेळी ह.भ.प. श्री मेंगडे महाराज, ह.भ.प. श्री पवार महाराज, ह.भ.प. श्री पवार महाराज माजलगावकर, श्री उद्धवबापू अपेगावकर, वानगाव येथील श्री जोगदंड, अंबेजोगाई येथील काँग्रेस नेते श्री मोरे साहेब यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
या सत्कारप्रसंगी उपस्थित महाराज मंडळी आणि मान्यवरांनी रमेशराव आडसकर यांना कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. विठ्ठल भक्ती, वारकरी संप्रदायाची परंपरा आणि संतांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या या भेटीमुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने झालेली ही भेट धार्मिक श्रद्धा, संतपरंपरा आणि सामाजिक सलोखा यांचा सुंदर संगम ठरली. विठ्ठलाच्या दर्शनाने आणि महाराज मंडळींच्या आशीर्वादाने आडसकर दाम्पत्याचा हा पंढरपूर दौरा विशेष ठरला.

