Monday, November 23, 2026
HomeUncategorizedमतदानापुरताच वडार समाजाचा वापर करता का? सतीश शिंदे यांचा सरपंच, उपसरपंच आणि...

मतदानापुरताच वडार समाजाचा वापर करता का? सतीश शिंदे यांचा सरपंच, उपसरपंच आणि गटविकास अधिकाऱ्यांना संतप्त सवाल!

Spread the love

नांदूर घाटातील वडार समाज मूलभूत सुविधांपासून वंचित; पाणी, रस्ते, घरकुल, रेशन आणि रोजगाराचे प्रश्न ऐरणीवर, आता तरी प्रशासन जागे होणार का?

नांदूर घाट, ता. केज | प्रतिनिधी

केज तालुक्यातील मोठ्या गावांपैकी एक असलेल्या नांदूर घाट येथे वडार समाजाची मोठ्या संख्येने लोकवस्ती आहे. मात्र, एवढी मोठी लोकसंख्या असूनही समाजाला आजही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र समोर येत आहे. निवडणुकीच्या काळात मतदानासाठी समाजाची आठवण होते, अनेक आश्वासने दिली जातात; मात्र निवडणुका संपल्यानंतर समाजाचे प्रश्न जैसे थेच राहतात. मग वडार समाजाचा वापर केवळ मतदानापुरताच करून घेतला जातो का? असा संतप्त सवाल समाज बांधवांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते सतीश शिंदे यांनी सरपंच, उपसरपंच आणि गटविकास अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केला आहे.

नांदूर घाट ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी लाखो रुपयांच्या निधीची उलाढाल होत असताना वडार समाजाच्या वस्तीत मात्र मूलभूत सुविधांचा अभाव असल्याची खंत व्यक्त होत आहे. समाजाला स्वतंत्र सभागृह नाही, लहान मुलांसाठी अंगणवाडीचा प्रश्न प्रलंबित आहे, पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था नाही, स्मशानभूमीचा प्रश्न सुटलेला नाही. याशिवाय रस्ते आणि घरकुल यांसारख्या मूलभूत सुविधांपासूनही अनेक कुटुंबे वंचित असल्याचे समाज बांधवांचे म्हणणे आहे.

दुष्काळात हाताला काम नाही, रेशनमध्ये नाव नाही; मग गरिबांनी जगायचे कसे?

सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. रोज मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या गरीब नागरिकांसमोर रोजगाराचा प्रश्न उभा आहे. अशा परिस्थितीत काही गरजू कुटुंबांची रेशन व्यवस्थेत नावे नसल्याने त्यांना धान्यापासूनही वंचित राहावे लागत असल्याची तक्रार आहे. पिण्याचे पाणी नाही, जाण्या-येण्यासाठी चांगला रस्ता नाही, घरकुलाचा लाभ नाही आणि रोजगाराचीही शाश्वती नाही. मग या समाजातील गरीब कुटुंबांनी जगायचे कसे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पाच वर्षे आरोप-प्रत्यारोपांत गेली; समाजाचे प्रश्न मात्र तसेच!

गावाच्या विकासासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येऊन काम करणे अपेक्षित असताना एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यातच पाच वर्षे वाया घालवली जात असल्याची नाराजी व्यक्त होत आहे. राजकीय मतभेद आणि गटबाजी यापेक्षा सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य मिळणे गरजेचे आहे. मात्र, गावातील वंचित घटकांच्या प्रश्नांकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याची भावना वडार समाज बांधवांमध्ये निर्माण झाली आहे.

सतीश शिंदे यांचा सामाजिक प्रश्नांसाठी सातत्याने पुढाकार

नांदूर घाट येथील सतीश शिंदे हे ज्येष्ठ नागरिकांच्या पेन्शनच्या प्रश्नांपासून ते गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्यापर्यंत विविध सामाजिक कामांमध्ये पुढाकार घेत आहेत. पाणी, घरकुल, स्मशानभूमी आणि इतर मूलभूत सुविधांसाठी ते ग्रामपंचायत, तहसील कार्यालय आणि पंचायत समिती स्तरावर सातत्याने आवाज उठवत असल्याचे सांगितले जाते. समाजातील वयोवृद्ध, निराधार, गरीब आणि गरजू कुटुंबांना न्याय मिळावा, यासाठी त्यांनी समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्याची भूमिका घेतली आहे.

आता आश्वासन नको, हक्काच्या सुविधांचा निर्णय हवा!

वडार समाजाला कोणाचीही दया किंवा सहानुभूती नको, तर शासनाच्या योजनांमधून मिळणाऱ्या हक्काच्या सुविधा हव्या आहेत. समाजासाठी सभागृह, अंगणवाडी, पिण्याचे पाणी, स्मशानभूमी, रस्ते, पात्र लाभार्थ्यांना घरकुल, रेशन कार्डमधील त्रुटी दूर करणे आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे या मागण्यांवर तातडीने कार्यवाही होणे आवश्यक आहे.

ग्रामपंचायत प्रशासनाने समाजाच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहावे. सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांनी प्रलंबित मागण्यांचा आढावा घ्यावा, तर गटविकास अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करावी आणि संबंधित प्रश्न मार्गी लावण्यासाठी ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी वडार समाज बांधवांच्या वतीने करण्यात येत आहे.

वडार समाज बांधवांनो, आपल्या हक्कांसाठी एकजुटीने उभे राहा!

समाजातील प्रत्येक घटकाने आपापसातील मतभेद बाजूला ठेवून संघटित होणे ही काळाची गरज आहे. मतदानाच्या वेळी आश्वासने देणाऱ्यांना आता विकासकामांचा हिशेब विचारण्याची वेळ आली आहे. समाजाच्या मुलांचे भविष्य, महिलांचे प्रश्न, ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न आणि गरीब कुटुंबांच्या जगण्याचा संघर्ष याकडे प्रशासनाने दुर्लक्ष करू नये.

प्रश्न एकच आहे… मतदानासाठी समाजाची आठवण होते, मग समाजाच्या हक्काच्या सुविधांसाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी पुढाकार कधी घेणार?

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सर्व बातम्या

Recent Comments