Friday, October 9, 2026
HomeUncategorizedटीईटी परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा; परिक्षार्थीच्या भवितव्याशी खेळ थांबवा...

टीईटी परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा; परिक्षार्थीच्या भवितव्याशी खेळ थांबवा – श्री बाजीराव ढाकणे

Spread the love

बीड प्रतिनिधी :

राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) संदर्भात समोर आलेल्या कथित पेपरफुटीच्या वृत्तांमुळे लाखो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या परिक्षार्थी मध्ये प्रचंड संताप, अस्वस्थता आणि निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्या स्थावर आणि सर्व प्रकारच्या मालमत्ता जप्त करण्यात याव्यात अशी मागणी महा एनजीओ फेडरेशन, महाराष्ट्र राज्यचे बीड जिल्हा समन्वयक बाजीराव ढाकणे यांनी केली आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात बाजीराव ढाकणे म्हणाले की, राज्यात पेपरफुटीच्या घटना आता अपवादात्मक राहिलेल्या नसून त्या वारंवार घडत असल्याने परीक्षा व्यवस्थेवरील परिक्षार्थी चा विश्वास डळमळीत होत आहे. हजारो विद्यार्थी दिवस-रात्र मेहनत करून, आर्थिक अडचणींवर मात करून आणि मोठ्या आशेने स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. मात्र काही समाजकंटक आणि भ्रष्ट प्रवृत्तीच्या व्यक्तींच्या कृत्यामुळे त्यांच्या परिश्रमावर एका क्षणात पाणी फिरते.

ते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित परीक्षा सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीने घेणे ही शासन आणि संबंधित यंत्रणांची मूलभूत जबाबदारी आहे. मात्र प्रत्येक वेळी पेपरफुटी किंवा गैरव्यवहाराच्या घटना समोर आल्याने शासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. दोषींना कठोर शिक्षा होत नसल्यामुळे अशा रॅकेटचे मनोबल वाढत असल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

“आज शासन आणि प्रशासकीय यंत्रणेने राजकीय घडामोडींइतकेच गांभीर्य विद्यार्थ्यांच्या भविष्याकडेही दिले पाहिजे. सत्तेचे राजकारण महत्त्वाचे असू शकते, परंतु लाखो तरुणांच्या आयुष्याचा प्रश्न त्यापेक्षा अधिक महत्त्वाचा आहे. प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विश्वास टिकवायचा असेल, तर परीक्षा प्रक्रियेत कोणतीही तडजोड होता कामा नये,” असे बाजीराव ढाकणे यांनी म्हटले आहे.

तसेच त्यांनी परीक्षा प्रक्रियेसाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, प्रश्नपत्रिका वितरणात तांत्रिक सुरक्षा, संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणे आणि पेपरफुटीच्या प्रत्येक प्रकरणाचा जलदगती न्यायालयामार्फत निकाल लावण्याची मागणी केली. दोषींना कठोर शिक्षा झाल्याशिवाय अशा घटनांना आळा बसणार नाही, असेही बाजीराव ढाकणे यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांचे भविष्य कोणत्याही राजकीय समीकरणापेक्षा मोठे आणि मौल्यवान आहे. त्यामुळे टीईटीच्या कथित पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, याची शासनाने ठोस हमी द्यावी, अशी मागणी महा एनजिओ फेडरेशनचे बीड जिल्हा समन्वयक श्री बाजीराव ढाकणे यांनी केली आहे.

digitalbeed
digitalbeedhttp://digitalbeed.in
DigitalBeed.in हे बीड जिल्हा तसेच महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या, सरकारी योजना, शेती, शिक्षण, नोकरी आणि तंत्रज्ञान विषयक माहिती देणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमचे उद्दिष्ट वाचकांपर्यंत अचूक, विश्वासार्ह आणि जलद बातम्या पोहोचवणे आहे. बीड जिल्ह्यातील केज, माजलगाव, अंबाजोगाई, परळी, गेवराई, आष्टी आणि इतर भागातील स्थानिक घडामोडी आम्ही सातत्याने प्रसिद्ध करतो. ताज्या अपडेटसाठी DigitalBeed.in नियमित वाचा आणि आमच्या सोशल मीडियावर देखील जोडलेले राहा.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सर्व बातम्या

Recent Comments