केज/प्रतिनिधी डिजिटल बीड
जिवाचीवाडी येथील साठवण तलावातून सुरू असलेला अनधिकृत व विनापरवाना पाणी उपसा रोखण्यासाठी जलसिंचन, महसूल, ग्रामविकास विभाग आणि महावितरण विभागाने संयुक्तपणे धडक कारवाई केली. या कारवाईत अनधिकृत पाणी उपशासाठी वापरण्यात येणारे पंप बंद करून त्यांचा वीजपुरवठा तातडीने खंडित करण्यात आला.
जिवाचीवाडी साठवण तलावातून परवानगीशिवाय पाणी उपसा केला जात असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून अनधिकृत पाणी उपसा करणाऱ्या पंपांवर कारवाई केली.
पाण्याचा गैरवापर रोखण्यासाठी प्रशासनाने ही मोहीम राबविल्याचे सांगण्यात आले.या संयुक्त कारवाईमध्ये जलसिंचन शाखेचे अधिकारी एस. डी. वाघमारे आणि एस. यू. हंगे, विडा येथील ग्रामविकास अधिकारी मुंडे, महसूल विभागाचे अधिकारी घुले, महावितरणचे चेलाईनमन घुले तसेच विडा ग्राम महसूल अधिकारी सोनवणे यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष उपस्थित होते.साठवण तलावातील उपलब्ध पाण्याचा योग्य वापर व्हावा आणि अनधिकृतपणे पाणी उपसा करून इतर शेतकरी व नागरिकांच्या हक्काच्या पाण्यावर परिणाम होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली.
अनधिकृत पाणी उपसा आढळल्यास संबंधितांवर यापुढेही कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.दरम्यान, संयुक्त पथकाच्या या कारवाईमुळे तलावातून विनापरवाना पाणी उपसा करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. प्रशासनाने घेतलेल्या या भूमिकेमुळे साठवण तलावातील पाण्याचा अनधिकृत वापर रोखण्यास मदत होणार असून, भविष्यातही अशा प्रकारच्या कारवाया सुरू राहणार असल्याचे संबंधित विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

