केज/प्रतिनिधी
उत्तर प्रदेश सरकारने अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यासोबतच त्यांना ५ लाख रुपयांपर्यंतचे आयुष्यमान आरोग्य विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे भारतीय जनता मजदूर संघाकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले असून, महाराष्ट्रातही अशाच प्रकारची अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.महिला व बालविकास विभागाच्या विविध योजना ग्रामीण आणि शहरी भागातील तळागाळापर्यंत पोहोचविण्यात अंगणवाडी सेविका व मदतनिसांची महत्त्वाची भूमिका असते. बालकांचे पोषण, आरोग्य, पूर्व प्राथमिक शिक्षण तसेच विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत या कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांच्या मानधनासोबतच सामाजिक सुरक्षा आणि आरोग्य संरक्षणाचा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे.
भारतीय जनता मजदूर संघाकडून निर्णयाचे स्वागतउत्तर प्रदेश सरकारच्या या निर्णयाचे भारतीय जनता मजदूर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शांत प्रकाश जाटव यांनी स्वागत केले आहे. अंगणवाडी भगिनींच्या प्रदीर्घ संघर्षाला आणि सेवेला या निर्णयातून योग्य मान्यता मिळत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.अंगणवाडी सेविका व मदतनिसांसह आशा, आशा संगिनी आणि माध्यान्ह भोजन कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय जनता मजदूर संघाने ३१ डिसेंबर २०२५ पासून राष्ट्रव्यापी निवेदन मोहीम सुरू केली होती. कर्मचाऱ्यांना अधिकृत ‘श्रमिक’ दर्जा, न्याय्य मानधन, आरोग्य विमा आणि सामाजिक सुरक्षा मिळावी, या प्रमुख मागण्यांसाठी हे अभियान राबविण्यात आले.उत्तर प्रदेश सरकारचा निर्णय हा या संघर्षाच्या दिशेने सकारात्मक पाऊल असल्याचे संघटनेने म्हटले आहे.देशभरातील कर्मचाऱ्यांसाठी लढा सुरूचउत्तर प्रदेशातील निर्णयामुळे अंगणवाडी आणि इतर क्षेत्रातील कर्मचाऱ्यांमध्ये नवीन आशा निर्माण झाली असली तरी देशभरातील सर्व कर्मचाऱ्यांना सन्मानजनक मानधन आणि सामाजिक सुरक्षा मिळेपर्यंत संघर्ष सुरूच ठेवणार असल्याचे शांत प्रकाश जाटव यांनी स्पष्ट केले.
या निर्णयाची माहिती स्थानिक वृत्तपत्रे आणि प्रसिद्धी माध्यमांद्वारे तळागाळातील कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवावी, तसेच प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या कात्रणी केंद्रीय कार्यालयाकडे पाठवाव्यात, असे आवाहनही त्यांनी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले आहे.महाराष्ट्रातही अंमलबजावणीची मागणीदरम्यान, उत्तर प्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांसाठी मानधनवाढ तसेच ५ लाख रुपयांपर्यंतचे आयुष्यमान आरोग्य कवच लागू करावे, अशी मागणी भारतीय जनता मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
राष्ट्रीय सचिव भाऊसाहेब घोडके, महाराष्ट्र सचिव धनंजय कुलकर्णी आणि मराठवाडा सचिव चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कामाची जबाबदारी आणि योगदान लक्षात घेता त्यांना आर्थिक स्थैर्य, आरोग्य संरक्षण आणि सामाजिक सुरक्षा मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

