Friday, October 9, 2026
HomeUncategorizedप्रतापराव सरनाईक यांची घोषणा हवेतच? स्वच्छता अधिभार घेत असतानाही केज बसस्थानकात शौचालयासाठी...

प्रतापराव सरनाईक यांची घोषणा हवेतच? स्वच्छता अधिभार घेत असतानाही केज बसस्थानकात शौचालयासाठी स्वतंत्र शुल्क; प्रवाशांमध्ये संताप?

Spread the love

प्रतापराव सरनाईक यांची घोषणा हवेतच? स्वच्छता अधिभार घेत असतानाही केज बसस्थानकात शौचालयासाठी स्वतंत्र शुल्क; प्रवाशांमध्ये संताप

केज | प्रतिनिधी

राज्य परिवहन महामंडळाकडून १५ एप्रिलपासून एसटी तिकीट खरेदी करताना प्रत्येक प्रवाशाकडून २ रुपये स्वच्छता अधिभार आकारला जात आहे. या माध्यमातून आतापर्यंत अंदाजे ३५ ते ४० कोटी रुपयांचा निधी जमा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र, एकीकडे स्वच्छता अधिभार आकारला जात असताना दुसरीकडे केज बसस्थानकातील सुलभ शौचालय वापरण्यासाठी महिला व पुरुष प्रवाशांकडून स्वतंत्र शुल्क आकारले जात असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

राज्याचे परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी बसस्थानकांवरील शौचालय सुविधा प्रवाशांसाठी मोफत उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर प्रवाशांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र केज बसस्थानकात अद्यापही शौचालय वापरण्यासाठी पैसे घेतले जात असल्याचा आरोप प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, प्रवासी आधीच तिकीटासोबत स्वच्छता अधिभार भरत आहेत. त्यामुळे स्वच्छता शुल्क आणि शौचालय वापर शुल्क अशा दुहेरी आकारणीचा आर्थिक भार सामान्य प्रवाशांवर पडत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. “जेव्हा स्वच्छता अधिभाराच्या नावाखाली पैसे घेतले जात आहेत, तेव्हा शौचालयासाठी पुन्हा शुल्क का?” असा सवाल अनेक प्रवासी उपस्थित करत आहेत.

दररोज शेकडो महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातील प्रवासी केज बसस्थानकाचा वापर करतात. महिला प्रवाशांना विशेषतः या परिस्थितीचा त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगितले जात आहे. शासनाच्या घोषणांनंतरही प्रत्यक्षात परिस्थितीत कोणताही बदल न झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

नागरिकांच्या मते, प्रवाशांकडून कोट्यवधी रुपयांचा स्वच्छता अधिभार जमा होत असताना मूलभूत सुविधांसाठी स्वतंत्र शुल्क आकारणे योग्य नाही. संबंधित प्रशासनाने याबाबत तातडीने लक्ष घालून वस्तुस्थिती स्पष्ट करावी आणि प्रवाशांची होत असलेली आर्थिक पिळवणूक थांबवावी, अशी मागणी जोर धरत आहे.

आता एसटी महामंडळ, बसस्थानक प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून या प्रकरणात नेमकी काय कारवाई होते, तसेच केज बसस्थानकातील शौचालय सुविधा प्रत्यक्षात शुल्कमुक्त कधी होणार, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

digitalbeed
digitalbeedhttp://digitalbeed.in
DigitalBeed.in हे बीड जिल्हा तसेच महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या, सरकारी योजना, शेती, शिक्षण, नोकरी आणि तंत्रज्ञान विषयक माहिती देणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमचे उद्दिष्ट वाचकांपर्यंत अचूक, विश्वासार्ह आणि जलद बातम्या पोहोचवणे आहे. बीड जिल्ह्यातील केज, माजलगाव, अंबाजोगाई, परळी, गेवराई, आष्टी आणि इतर भागातील स्थानिक घडामोडी आम्ही सातत्याने प्रसिद्ध करतो. ताज्या अपडेटसाठी DigitalBeed.in नियमित वाचा आणि आमच्या सोशल मीडियावर देखील जोडलेले राहा.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सर्व बातम्या

Recent Comments