एकल महिलांच्या सन्मानातून साजरा झाला महाराष्ट्र दिन

महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हनुमान नगर शाळेत एकल भगिनीच्या हस्ते उत्साहात ध्वजारोहण

केज, प्रतिनिधी : –
मौजे जोला (ता. केज) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हनुमान नगर येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात एकल भगिनी सुनिता रत्नाकर ढाकणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा इतिहास, महाराष्ट्र दिनाचे महत्त्व तसेच सामाजिक एकात्मता आणि शैक्षणिक प्रगती याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाला सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन मुरलीधर ढाकणे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हनुमान नगरचे मुख्याध्यापक बाबुराव ढाकणे, सहशिक्षक संदीप आणेराव, सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई बाजीराव ढाकणे, अंगणवाडी कार्यकर्ती सविता सारुक यांच्यासह गावातील नागरिक, पालक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, घोषवाक्ये आणि सांस्कृतिक सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली. महाराष्ट्र दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि राज्याविषयी अभिमानाची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे मुख्याध्यापक बाबुराव ढाकणे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या शिक्षकवर्ग आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने करण्यात आले. कार्यक्रमानंतर उपस्थितांना शुभेच्छा देत समारोप करण्यात आला.

एकल महिलांच्या आणि त्यांच्या मुलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांचा सक्रिय व सकारात्मक प्रतिसाद अत्यंत आवश्यक आहे, असे मत सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई बाजीराव ढाकणे यांनी व्यक्त केले. त्यांनी यावर भर देताना सांगितले की, समाजातील एकल महिलांना केवळ आर्थिक मदतीची नव्हे, तर शैक्षणिक, सामाजिक आणि मानसिक आधाराचीही तितकीच गरज आहे. त्यांच्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, सुरक्षित वातावरण आणि समान संधी उपलब्ध करून दिल्यासच त्यांचे भविष्य उज्ज्वल होऊ शकते.
यासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांनी विविध योजना प्रभावीपणे राबवून या घटकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे.

महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी कौशल्यविकास, स्वयंरोजगाराच्या संधी आणि शासकीय योजनांची अंमलबजावणी यावर विशेष लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
समाजातील सर्व घटकांनी संवेदनशीलतेने पुढे येत एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी सहकार्य करणे ही काळाची गरज असून, त्यातूनच अधिक सक्षम आणि समतोल समाजाची निर्मिती होईल, असा विश्वास साऊ एकल महिला समितीच्या सौ आशाताई ढाकणे यांनी व्यक्त केला.

Leave a Comment