ॲड.लखन सोनवणे आरोपीच्या वतीने न्यायालयात मांडली भक्कम बाजू
केज/प्रतिनिधी
साखर कारखान्याच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणातील केज तालुक्यातील तिन्ही आरोपीला नेवासा जिल्हा व सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला असूननेवासा पोलीस ठाण्यात ६४ लाख ८० हजार रुपयांच्या आर्थिक व्यवहाराशी संबंधित बहुचर्चित गुन्ह्यामध्ये नेवासा सत्र न्यायालयाने अर्जदारांना मोठा दिलासा देत ३ आरोपींचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. सदर प्रकरण हे व्यावसायिक व दिवाणी स्वरूपाचे असून त्यास फौजदारी गुन्हा ठरवणे चुकीचे असल्याचे बचाव पक्षातर्फे माननीय न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
या खटल्यामध्ये आरोपींच्या वतीने विधिज्ञ ॲड. लखन विजय सोनवणे यांनी आरोपींची बाजु मांडली तरसरकारी पक्षाची बाजू मांडताना सरकारी वकील यांनी युक्तिवाद केला की,नेवासा पोलीस ठाण्यात दिनांक २६ ऑक्टोबर २०२६ रोजी नोंदवण्यात आलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार गु.र.नं.८८१/२०२६ त्यामध्ये आरोप करण्यात आला की २०२६-२०२७ या गळीत हंगामासाठी स्वामी समर्थ शुगर लिमिटेड कारखान्याकडे ऊस तोडणीकरिता बैलगाडी व ट्रॅक्टर मजुरी पुरवण्याबाबत आरोपींसोबत तोंडी किंवा लेखी करार करण्यात आला होता. या करारापोटी आरटीजीएस द्वारे उत्तरेश्वर बाबासाहेब चौरे वय ४६ वर्षे व आश्रूबा ज्ञानोबा चौरे वय ४९ वर्षे, वरील दोघेही रा.तुकोचीवाडी ता.केज आणि रामहारी आनंद चौरे वय ३२ वर्षे रा. जीवाचीवाडी ता.केज वरील तिघा जणांच्या बँक खात्यावर प्रत्येकी २१ लाख ६० हजार रुपये प्रमाणे एकूण ६४ लाख ८० हजार रुपयांची आगाऊ रक्कम (Advance) वर्ग करण्यात आली होती.
मात्र, आरोपींनी ठरल्याप्रमाणे मजुरांचा पुरवठा न करताच मजुर इतरत्र कामावर वळवली, ज्यामुळे साखर कारखान्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले,व कारखान्याची यामुळे फसवणूक करण्यात आली तरी आरोपींना जामीन देण्यात येऊ नये संयुक्त सरकारी पक्षाने केला.तीनही आरोपीच्या वतीने ॲड. लखन विजय सोनवणे यांनी बाजू मांडली आणि खालील महत्त्वाचे मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.करण्यात आलेला करार हा दिवाणी स्वरूपाचा करार आहे व हा संपूर्ण व्यवहार रोख किंवा लपवून न करता नियमित हंगामी आगाऊ रकमांचा (Seasonal Advance) व्यावसायिक करार होता. यात सुरुवातीपासून फसवणुकीचा कट किंवा ‘मेन्स रिया’ (Criminal Intent) नव्हता.
त्याचप्रमाणे साखर कारखान्याने घेतलेली आगाऊ रक्कम पूर्णपणे सुरक्षित आहे. कारखान्याने अर्जदारांच्या तसेच अर्जदार क्र. ३ च्या वडिलांच्या मालकीच्या जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर कायदेशीर भार/गहाण (Lien/Charge) आधीच नोंदवला आहे. यामुळे कारखान्याची थकबाकी सुरक्षित असून, फसवणुकीचा किंवा अपहाराचा प्रश्नच उद्भवत नाही. तसेच घटनेनंतर कोणतीही ठोस कारणमीशिवाय फिर्यादीत तब्बल २० दिवसांचा विलंब करण्यात आला असून, हा उशीर फिर्यादी पक्षाच्या मूळ दाव्याला बाधक आहे.
आणि पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३१६(२) (गुन्हेगारी विश्वासघात) आणि ३१८(४) (फसवणूक) ही दोन्ही कलमे एकाच वेळी लावली आहेत, जी कायदेशीरदृष्ट्या एकमेकांशी विसंगत आहेत. सर्व आर्थिक देवाणघेवाण ही अधिकृत बँक खात्यांमार्फत (RTGS) आणि कारखान्याच्या अधिकृत दस्तऐवजांद्वारे झालेली असल्यामुळे या प्रकरणात कोठडीत चौकशीची (Custodial Interrogation) कोणतीही गरज नाही, हे त्यांनी पुराव्यासह न्यायालयाला पटवून दिले.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि कागदपत्रे काळजीपूर्वक तपासल्यानंतर, नेवासा सत्र न्यायालयाने आरोपींना तपासात सहकार्य करण्याच्या आणि अटी-शर्तींच्या अधीन राहून अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.प्रकरणामध्ये तिन्ही आरोपीच्या वतीने ॲड लखन विजय सोनवणे यांनी बाजू मांडली.

